Thursday, July 16, 2026

लोकसंख्या व बदलते वास्तु नियम: पोषक ते शोषक प्रवास

कोणत्याही जिवंत संस्कृतीचे आणि मानवी प्रगतीचे दर्शन तेथील वास्तुकलेमध्ये घडत असते. मानवाने जेव्हा वास्तूची रचना करण्यास सुरुवात केली, तेव्हा निसर्गाशी एकरूप होऊन तादात्म्य साधणे हाच त्याचा मुख्य उद्देश होता. मर्यादित लोकसंख्या आणि कमी गरजा यांमुळे पूर्वीचे वास्तूचे नियम मानवी जीवनासाठी व पर्यावरणासाठी "पोषक" ठरले.


मात्र, गेल्या १०० ते २०० वर्षांत ज्या विस्फोटक पद्धतीने लोकसंख्या वाढली, तितक्याच वेगाने शहरांचे विस्तारीकरणही झाले. जमिनीची टंचाई आणि व्यावसायिक नफा कमावण्याची स्पर्धा यांमुळे वास्तूनिर्मितीचे नियम आणि व्याख्या पूर्णपणे बदलल्या. पूर्वी जे नियम शुद्ध हवा आणि प्रकाश मिळवण्यासाठी बनवले गेले होते, ते आजकाल केवळ चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) लाटण्यासाठी वापरले जाताना दिसतात. परिणामी, नैसर्गिक संसाधनांचा अमर्याद उपभोग घेणारी आणि मानवाची मानसिक शांतता हिरावून घेणारी एक "शोषक व्यवस्था" उभी राहिली आहे. लोकसंख्येच्या दबावाखाली बदलत गेलेल्या वास्तूनियमांचा आणि पर्यावरणाला घातक ठरणारे सिमेंटचे खोके उभारण्याच्या या "पोषक ते शोषक" प्रवासाचा वेध घेणे आज अत्यंत गरजेचे झाले आहे.


Source – Pinterest.com


"निवारा" ही मानवाच्या तीन मूलभूत गरजांपैकी एक अत्यंत महत्त्वाची गरज आहे. अश्मयुगापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत निसर्गातील आव्हानांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मानवाने गुहा, माती, लाकूड तसेच आजच्या सिमेंट-काँक्रिटच्या स्वरूपात आसरा शोधला आहे. मानवाच्या उत्क्रांतीनंतर जसजशी लोकसंख्या वाढू लागली, तसा मानवाने गुहेतील आश्रय सोडून सपाट मैदानी प्रदेशात झाडाझुडपांच्या पाना-फांद्यांपासून तयार केलेल्या घरांमध्ये राहण्यास सुरुवात केली. कालांतराने या पाना-पाचोळ्याच्या घरांची जागा मातीच्या घरांनी घेतली. ही घरे वादळ-वाऱ्याचा सामना करू शकतील इतकी भक्कम नसली, तरी इतर हिंस्त्र प्राणी किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांपासून (सरीसृपांपासून) संरक्षण देणारी नक्कीच होती.


Source – Pinterest.com


नंतरच्या काही दशकांतच नैसर्गिक आव्हाने आणि वास्तुबांधकामातील अडचणी लक्षात घेऊन मानवाने वास्तुनिर्मितीचे नियम तयार केले आणि त्यानुसार घरबांधणी सुरू झाली. यामध्ये सूर्योदय व सूर्यास्ताच्या दिशेचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो, याचा सखोल अभ्यास करून खोल्यांची रचना केली गेली. तेव्हा लोकसंख्या कमी असल्यामुळे घरे एकमेकांना लागून नसायची. हवा खेळती राहण्यासाठी घराच्या चारही बाजूंनी पुरेशी जागा सोडली जायची. दारे आणि खिडक्यांची रचना समोरासमोर किंवा स्थानिक हवामानानुसार तिरकस (Cross Ventilation) असायची, जेणेकरून हवा येण्या-जाण्यासाठी कोणत्याही कृत्रिम उपकरणांची गरज भासू नये.


Source – Pinterest.com


या काळात निसर्गाकडून काही हिसकावून घेण्यापेक्षा स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या साहित्याचाच प्रामुख्याने वापर केला जात असे. विटा किंवा दगड जोडण्यासाठी चुना, गूळ, बेलफळाचा रस आणि मेथीचे पाणी यांचे मिश्रण वापरले जाई. चुन्याच्या जंतुनाशक आणि सच्छिद्र गुणधर्मामुळे घरातील वातावरण उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार राहण्यास मदत होत असे. म्हणूनच बांधकामात याचा वापर केला जाई. अशी ही भक्कम घरे नैसर्गिक आपत्तींनाही सहज झेलू शकणारी होती.


Source – Pinterest.com


पूर्वी घरांची अंतर्गत रचना कौटुंबिक स्वास्थ्य आणि मानसिक शांतता केंद्रस्थानी ठेवून केली जायची. यामध्ये घराचा मध्यभाग उघडा ठेवणे (चौक सोडणे), दारापुढे पडवी बांधणे, बाहेरील पाणी किंवा सरपटणारे प्राणी घरात येऊ नयेत म्हणून ओटा बांधणे आणि दरवाजांना उंच उंबरे बसवणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होता. तेव्हा लोकसंख्या मर्यादित होती आणि जमीन भरपूर उपलब्ध होती; त्यामुळे निसर्गाचे नियम मोडून इमारतींची उंची वाढवण्याची कोणतीही स्पर्धा नव्हती. तसेच, प्रत्येक घराला स्वतःची स्वतंत्र विहीर आणि परसबाग असल्यामुळे, अन्न व पाण्याची काही प्रमाणातील गरज घरातल्या घरातच भागवली जात असे. थोडक्यात सांगायचे तर, ती जीवनशैली खऱ्या अर्थाने स्वावलंबी आणि आरोग्यदायी होती.


१८ व्या शतकाच्या सुमारास औद्योगिक, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे बांधकामाचे स्वरूप पूर्णपणे बदलले. पूर्वीच्या पर्यावरणपूरक घटकांची जागा आधुनिक सिमेंट काँक्रीटनी घेतली. तसेच, वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतीमुळे पूर्वीचा वाढता मृत्यूदर नियंत्रणात आला, परंतु वाढलेला जन्मदर कमी झाला नाही. परिणामी, लोकसंख्येचा प्रचंड विस्फ़ोट झाला. वाढलेल्या लोकसंख्येच्या निवासासाठी जमीन अपुरी पडू लागली. आधुनिक सिमेंट काँक्रीटमुळे शहरांचे क्षितिजसमांतर (आडवे) विस्तारीकरण थांबून उभे विस्तारीकरण सुरू झाले. अनेक टोलेजंग इमारतींमुळे आजूबाजूच्या घरांचा सूर्यप्रकाश आणि खेळती हवा कोंडली गेली. हीच खरी नैसर्गिक संसाधनांवरील हक्क हिरावून घेण्याची "शोषक" सुरुवात होती.


Source – Pinterest.com


लोकसंख्येच्या प्रचंड दबावामुळे नैसर्गिक संसाधनांचा मर्यादित वापर करून शांतता देणारे वास्तूचे नियम आता "कमी जागेत जास्तीत जास्त चटई क्षेत्र (FSI)" कसे काढता येईल, यापुरतेच मर्यादित राहिले आहेत. काही इमारतींमध्ये बाल्कनी, ओटा, डक्ट यांसारख्या मोकळ्या हवेच्या जागा फक्त कागदपत्रांपुरत्याच मर्यादित ठेवून, प्रत्यक्षात त्यांचे खोल्यांमध्ये कसे रूपांतर करता येईल, याच्या पळवाटा शोधल्या जाऊ लागल्या. नियमांचे असे बाजारीकरण मानवी आरोग्याचे "शोषण" करणारे ठरले आहे.

 

सिमेंट काँक्रिटच्या दिवसा उष्णता शोषून रात्री ती बाहेर टाकण्याच्या गुणधर्मामुळे शहरांचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मोठ्या इमारतींना बाहेरून बसवल्या जाणाऱ्या काचांमुळे उष्णता आतच कोंडली जाते. परिणामी, २४ तास एअर कंडिशनरवर (वातानुकूलित यंत्रणेवर) अवलंबून राहून माणूस आणि निसर्ग या दोघांचेही एकाच वेळी "शोषण" होताना दिसते. आजकाल बऱ्याच गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये प्रथमतः हवा, प्रकाश आणि निसर्गाचे नियम पायदळी तुडवले जातात; आणि नंतर घर घेतल्यावर वास्तू दोषाची भीती दाखवली जाते. वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेण्याऐवजी दिशा, तत्त्व, ग्रह, देवता, नक्षत्र इत्यादींचा आधार घेऊन तोडफोड सुचवणे, तसेच महागडी यंत्रे व खडे विक्रीच्या नावाखाली सामान्य माणसाचे आर्थिक आणि मानसिक शोषण केले जाते. थोडक्यात, प्रथम बिल्डर शोषण करतो आणि नंतर तथाकथित वास्तू तज्ज्ञ खिसे रिकामे करतो, असा हा दुहेरी "शोषक प्रवास" सर्रास दिसून येतो.


Source – Pinterest.com


याचा थेट परिणाम मानवावर आणि निसर्गावर झालेला दिसतो. आज वैद्यकीय शास्त्रात "रुग्ण इमारत लक्षणसमूह" (Sick Building Syndrome) हा शब्द अधिकृतपणे वापरला जातो. ज्या इमारतींमध्ये खेळती हवा नसते, तेथील लोकांना सतत डोकेदुखी, थकवा, डोळ्यांची जळजळ आणि श्वसनाचे विकार उद्भवताना दिसतात. सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश शरीरात 'ड' जीवनसत्त्व तसेच 'सेरोटोनिन' (आनंददायी संप्रेरक) निर्माण करण्यास मदत करतो. आजच्या कोंदट आणि दाटीवाटीच्या सदनिका (फ्लॅट) संस्कृतीत जिथे दिवसाही विजेचे दिवे लावावे लागतात, तिथे याचे प्रमाण बिघडते. परिणामी रात्रीची झोप न येणे, चिडचिड वाढणे, नैराश्य येणे इत्यादींचे प्रमाण वाढले आहे.

निसर्गावर होणाऱ्या परिणामांचा विचार केला असता रस्ते, अंगणे, मोकळ्या जागा इत्यादी सर्वत्र काँक्रीटीकरण झाल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरायला जागाच उरलेली नाही. परिणामी, पावसाचे पाणी वाहून जाते आणि भूजल पातळी कमालीची खालावते. सर्वत्र वाढलेल्या या सिमेंटच्या जंगलात झाडे क्वचितच आढळतात, ज्यामुळे शहरी भागांतून पक्ष्यांचे स्थलांतर झालेले दिसते.

पूर्वी निसर्गाचा अविभाज्य भाग वाटणारे घर आज निसर्गाला दाराबाहेर रोखण्यासाठी उभारलेली तटबंदी वाटते. पण निसर्गाला बाहेर रोखण्याच्या प्रयत्नांत आपण स्वतःलाच सिमेंटच्या पिंजऱ्यात कैद करून घेतले आहे. आज आपण लोकसंख्या कमी करू शकत नाही, परंतु लोकसंख्या नियंत्रणात नक्कीच ठेवू शकतो. 'ग्रीन बिल्डिंग' (हरित इमारत), सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग (भूजल पुनर्भरण) इत्यादी पर्यावरणपूरक संकल्पनांसोबतच लोकसंख्या नियंत्रणसुद्धा तितक्याच प्रभावीपणे जनमानसात रुजवून अमलात आणण्याची गरज आहे. पृथ्वीचे सरासरी तापमान १.५ अंश सेल्सिअसच्या वर जाणे शास्त्रज्ञांनी धोकादायक ठरवले असतानाही आज ते २ अंशांच्या वर गेले आहे, ज्यामुळे सुपर अल निनो, दुष्काळ, महापूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. जात-धर्माच्या पलीकडे जाऊन मनुष्यप्रजाती वाचवण्यासाठी सामान्य माणूस जे ठोस पाऊल आज उचलू शकतो, त्याचे नाव आहे "लोकसंख्या नियंत्रण".

No comments:

Post a Comment

लोकसंख्या व बदलते वास्तु नियम: पोषक ते शोषक प्रवास

कोणत्याही जिवंत संस्कृतीचे आणि मानवी प्रगतीचे दर्शन तेथील वास्तुकलेमध्ये घडत असते. मानवाने जेव्हा वास्तूची रचना करण्यास सुरुवात केली, तेव्हा...