Saturday, July 4, 2026

पावसाळा आणि महाराष्ट्र पठारावरील घरांची बदलती वास्तुकला: इतिहास ते वर्तमान

महाराष्ट्र हा भारताचा मध्यवर्ती आणि समुद्रकिनारा लाभलेला भूभाग असला, तरीही येथे सर्वत्र पाऊस एकसारखा पडत नाही. पश्चिमेकडील किनारपट्टी (कोकण), त्याला लागून असलेला सह्याद्रीचा घाटमाथा, पठारी प्रदेश (मराठवाडा व विदर्भ) आणि खान्देश या चारही उपप्रदेशांतील पावसाचे प्रमाण वेगवेगळे आहे. येथील वैविध्यपूर्ण भौगोलिक स्थिती आणि हवामानच त्या-त्या भागातील पावसाचे स्वरूप ठरवते.

AI generated image

आजपासून सुमारे सहा ते सात कोटी वर्षांपूर्वी (जेव्हा डायनासोरचा कालखंड संपुष्टात येत होता), अरबी समुद्र व सह्याद्रीच्या पट्ट्यात पृथ्वीच्या वरच्या थराला (Crust) मोठ्या आणि लांबलचक भेगा पडल्या होत्या. या भेगांमधून अत्यंत तप्त व वितळलेला रस, ज्याला 'मॅग्मा' म्हणतात, अतिशय संथ गतीने बाहेर पडू लागला. हा लाव्हा 'बेसाल्ट' (Basalt) प्रकारचा असून अत्यंत पातळ व प्रवाही होता. यामध्ये सिलिकाचे प्रमाण कमी आणि लोह तसेच मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्याने त्याला गडद काळा रंग मिळाला होता.

तब्बल पाच लाख वर्षांपेक्षाही अधिक काळ चाललेल्या या उद्रेकामुळे सह्याद्रीपासून पूर्व व पश्चिमेकडे ज्वालामुखीच्या थरांची पायऱ्यांसारखी रचना झाली; ज्याला पुढे 'डेक्कन ट्रॅप' (Deccan Trap) म्हणून ओळखले जाऊ लागले. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये पठारी प्रदेशाची निर्मिती झाली.

या पठारांच्या निर्मितीदरम्यान ज्वालामुखीचा लावा पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरत गेल्यामुळे, पठाराचा नैसर्गिक उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे झाला. परिणामी, येथील प्रमुख नद्या (गोदावरी, कृष्णा, भीमा इत्यादी) पूर्ववाहिनी बनल्या. लाखो वर्षांच्या कालखंडात घट्ट झालेल्या बेसाल्ट (Basalt) खडकावर ऊन, वारा आणि पाऊस यांचा सतत परिणाम (रासायनिक व भौतिक अपक्षय - Weathering) झाला. यामुळे खडक झिजून त्याचे विघटन झाले आणि या प्रक्रियेतून पठारी प्रदेशावर अत्यंत सुपीक अशी 'रेगूर मृदा' म्हणजेच 'काळी कापसाची माती' तयार झाली.

महाराष्ट्राचा पठारी प्रदेश हा पावसाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. येथे बहुतांश वेळा पावसाचे प्रमाण कमी असते. परंतु मान्सूनच्या काळात काही वेळेस तीव्र स्वरूपाची अतिवृष्टी देखील अनुभवण्यास मिळते. पावसाची ही अनिश्चितता, स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेली संसाधने आणि तत्कालीन जीवनशैली यांमुळे येथील घरबांधणीच्या पद्धतींमध्ये प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण बदल होत गेले.

Source - kokanikokana.blogspot.com

पूर्वी या पठारी प्रदेशात चुनखडीयुक्त पांढरी किंवा काळी माती मुबलक प्रमाणात उपलब्ध होती. याच स्थानिक कच्च्या मालाचा वापर करून पुढे 'धाब्याची घरे' बांधण्यास सुरुवात झाली. इतिहासामध्ये या घरांचे संदर्भ ताम्रपाषाण युगापासून, म्हणजेच इसवी सन पूर्व १५०० ते १००० च्या सुमारास (सुमारे ३००० ते ३५०० वर्षांपूर्वी) आढळतात. मातीच्या भक्कम भिंतींवर लाकडी वासे (खांब) आणि त्यावर मातीचे सपाट छप्पर, अशा रचनेमुळे कमी पावसाच्या प्रदेशात ही घरे अत्यंत सोयीची ठरली. पुढे हीच घरे सामान्य जनता आणि शेतकऱ्यांची हक्काची निवासस्थाने बनली. अठराव्या शतकापर्यंत जसजसे बांधकाम तंत्रज्ञान प्रगत होत गेले, तसतशी बहुमजली व अधिक पक्की धाब्याची घरे बांधली जाऊ लागली.

              Source - kokanikokana.blogspot.com

इ.स. १७०० ते १९०० या कालखंडात पठारी प्रदेशात नागरीकरण वाढले आणि 'वाडा' संस्कृती (किंवा वाडा पद्धती) अस्तित्वात आली. धाब्याच्या घरांपेक्षा अधिक टिकाऊ व मजबूत असलेली ही बांधकाम पद्धती पावसाच्या बदलत्या स्वरूपाचा विचार करून विकसित केली गेली होती; ज्यामध्ये मध्यभागी चौक, उतरती व कौलारू छते आणि उंच ओटे यांसारख्या घटकांचा प्रामुख्याने समावेश होता.                 

                 Source – www.incredibleindia.gov.in

वाड्याच्या मध्यभागी असलेल्या एक अथवा अनेक उघड्या चौकांमध्ये पडणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी चौकाच्या जमिनीला विशिष्ट उतार दिला जाई. हे पाणी भुयारी मोऱ्यांद्वारे (गटारांद्वारे) वाड्याबाहेर किंवा विहिरीत सोडून दिले जाई. काही वाड्यांमध्ये तर पावसाचे हे पाणी साठवण्यासाठी भूमिगत टाक्या (पाण्याची टाकी) तयार केल्या जात, ज्यांचा उपयोग उन्हाळ्यात पिण्यासाठी किंवा इतर वापरासाठी होत असे.

                                 Source – www.dhepewada.com

छताच्या बांधकामासाठी लाकडी सांगाड्याचा वापर करून, बाहेरील बाजूस उतार दिला जाई आणि त्यावर मातीची कौले रचली जात. यामुळे पठारी भागात अचानक येणाऱ्या मुसळधार पावसाचे पाणी छतावर न साठता वेगाने वाहून जात असे. पावसाच्या सरी थेट मुख्य दरवाजावर पडू नयेत म्हणून त्यासमोर पडवी (varandah) बांधण्याची आणि बाहेरील पावसाचे पाणी घरात येऊ नये म्हणून उंच ओटे उभारण्याची पद्धत याच कालखंडात रूढ झाली.

१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात (ब्रिटिश कालखंडापासून ते स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत) घरबांधणीच्या पद्धतीत मोठे बदल घडून आले. या काळात साच्यांच्या साहाय्याने तयार केलेली, मजबूत व लाल रंगाची मंगलोरी कौले वापरात आली. पठारी प्रदेशातील अनिश्चित पाऊस आणि वेगवान वाऱ्यांचा सामना करण्यासाठी लोखंडी कात्र्यांचे (Trusses) पक्के सांगाडे तयार करून त्यावर ही कौले बसवली जाऊ लागली.

भिंतींच्या बांधकामासाठी भाजलेल्या विटा आणि चुन्याचा वापर सुरू झाल्यामुळे भिंती ओलाव्यापासून सुरक्षित राहू लागल्या आणि घरांचे आयुष्य वाढले. तसेच, पावसाचे पाणी एकत्र करण्यासाठी छताच्या कडांना पत्र्याचे पन्हाळे (Gutter) बसवण्याची पद्धत आणि वाऱ्यासह येणाऱ्या पावसाच्या सरींपासून संरक्षण मिळवण्यासाठी खिडक्यांना तिरप्या झडपा (Louvers/Sunshades) लावण्याची पद्धत याच काळात सुरू झाली.

आजच्या आधुनिक महाराष्ट्रात (२१ व्या शतकात) पठारी प्रदेशातील घरांचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. बदलते हवामान आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, कमी जागा अन् आधुनिक सुविधांना प्रामुख्याने पसंती दिली जाते. सध्या ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांत सिमेंट, वाळू आणि लोखंडाचा वापर करून सपाट छताची पक्की घरे बांधली जातात. पावसापासून छताचे संरक्षण व्हावे यासाठी त्यावर 'जलरोधक' (वॉटरप्रूफिंग) प्रक्रिया केली जाते.

    Source – thearchitectsdiary.com

बदलत्या हवामानामुळे आज पठारी प्रदेशाला कधी अल्पवृष्टी, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी अशा विविध संकटांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून ' वर्षाजल संचयन' (रेन वॉटर हार्वेस्टिंग) हे आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे पावसाचे पाणी वाया जाऊ न देता, ते गाळून (फिल्टर करून) विहिरीत किंवा कूपनलिकेच्या (बोरवेल) माध्यमातून भूगर्भात सोडले जाते. पावसाचे पाणी घरात येऊ नये म्हणून हल्ली खिडक्यांना लाकडाऐवजी 'ॲल्युमिनियम स्लाइडिंग'चे स्वरूप दिले जाते, तसेच खिडक्यांच्या बाहेरील बाजूस काँक्रीटचे 'सनशेड' (Chajja’s) बांधले जातात.

बांधकाम क्षेत्रात जशीजशी प्रगती होत गेली, तसतशी निसर्गाशी सुसंगत किंवा मिळतेजुळते घर बांधण्याची परंपरा लोप पावली आणि पक्की घरे बांधण्याच्या हव्यासापोटी निसर्गाचा ऱ्हास सुरू झाला. पूर्वी सहज उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक बांधकाम साहित्याची जागा आता व्यावसायिक व कृत्रिम साहित्याने घेतली आहे. परिणामी, शतकानुशतके नैसर्गिक संरक्षण देणारी जुनी घरे आजच्या कृत्रिम संसाधनांमुळे केवळ ५५ ते ६० वर्षेच टिकून राहतात. पूर्वीची मातीची विशिष्ट उताराची किंवा कौलारू घरे पावसाचे पाणी छतावरून वेगाने वाहून लावत असत. याउलट, आजच्या सपाट स्लॅबवर (सिमेंटच्या छतावर) योग्य जलरोधक (वॉटरप्रूफिंग) प्रक्रिया न केल्यास अथवा योग्य उतार न दिल्यास पाणी छतातून झिरपण्याची शक्यता असते. पूर्वी माती, चुना व लाकूड यांपासून बनवलेली घरे उष्णतेची दुर्वाहक असल्याने पावसाळ्यात ती आतून उबदार राहत असत. परंतु आजची सिमेंटची घरे उष्णता शोषून घेत असल्याने आतील तापमान ऋतुमानानुसार अनुकूल राहत नाही, परिणामी ऋतूबदलामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसते.

    

   AI generated image

पूर्वीची घरे पूर्णपणे पर्यावरणपूरक होती. घर पाडल्यानंतरही त्यातील साहित्य पुनर्वापरासाठी योग्य ठरत असे, ज्यामुळे तिचा 'कार्बन फूटप्रिंट' (कार्बन उत्सर्जन) शून्य असायचा. याउलट, आज सिमेंट व विटांच्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. या साहित्यापासून तयार केलेली घरे पर्यावरणपूरक नसतात. तसेच, घरात हवा खेळती राहण्यासाठी पुरेशा खिडक्या नसल्यास, सिमेंटच्या उष्णतेमुळे श्वसनाचे व त्वचेचे विकार उद्भवू शकतात.

यावरूनच असे स्पष्ट होते की, पूर्वीची घरे स्थानिक हवामान आणि निसर्गाशी समरस झालेली 'जिवंत घरे' होती. आजची सिमेंटची घरे जरी मजबूत व सर्व सोयीसुविधांनी युक्त वाटत असली, तरी पठारी प्रदेशातील विषम हवामानासाठी ती तितकीशी सुखद किंवा आरामदायक ठरत नाहीत. याच कारणामुळे, आजकाल पुन्हा एकदा 'शाश्वत वास्तुकले’ अंतर्गत (Sustainable Architecture) माती आणि चुन्यासारख्या नैसर्गिक घटकांचा आधुनिक पद्धतीने कसा वापर करता येईल, यावर संशोधन सुरू आहे.

No comments:

Post a Comment

लोकसंख्या व बदलते वास्तु नियम: पोषक ते शोषक प्रवास

कोणत्याही जिवंत संस्कृतीचे आणि मानवी प्रगतीचे दर्शन तेथील वास्तुकलेमध्ये घडत असते. मानवाने जेव्हा वास्तूची रचना करण्यास सुरुवात केली, तेव्हा...