Tuesday, June 30, 2026

वटपौर्णिमा व वास्तुशास्त्र

 हिंदू संस्कृतीमध्ये सण-उत्सवांना केवळ धार्मिकच नव्हे, तर सामाजिक, कौटुंबिक आणि पर्यावरणीय महत्त्व लाभले आहे. यांपैकी 'वटपौर्णिमा' हा विवाहित महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा, पारंपरिक आणि भावनिक जिव्हाळ्याचा सण आहे. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला (साधारणतः जूनमध्ये) हा सण साजरा केला जातो. या सणाला पूजा आणि व्रतवैकल्ये करण्याची अतिशय जुनी परंपरा लाभली आहे.

सर्वश्रुत असलेली 'सत्यवान-सावित्रीची कथा' या सणाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करते. या कथेचा सर्वात जुना उल्लेख महाभारतातील 'वनपर्वा' अंतर्गत येणाऱ्या उपपर्वात, ऋषी मार्कंडेय आणि युधिष्ठिर यांच्यातील संभाषणात येतो. याचाच अर्थ असा की, हा सण महाभारतकाळापूर्वीपासून, म्हणजेच इसवी सन पूर्व ४०० (साधारण २४०० वर्षांपूर्वी) पासून जनमानसात रूढ असावा. लोकमान्यतेनुसार, विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी व सुखी संसारासाठी हे व्रत करतात. वडाचे पूजन करताना महिला वडाच्या झाडाला सुती दोऱ्याने सात वेढे देतात. हे सात वेढे पती-पत्नीच्या सात जन्मांच्या अतूट बंधनाचे प्रतीक मानले जातात. तसेच, वटवृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा वास असतो, अशीही श्रद्धा आहे.

हा झाला धार्मिक दृष्टिकोन; परंतु वटपौर्णिमेचा वास्तविक आणि वैज्ञानिक अर्थ पाहिला, तर वड (Ficus benghalensis) हा मूळतः भारतातील दमट व उष्ण हवामानात, तसेच भूजल स्रोतांच्या जवळ वाढणारा वृक्ष आहे. प्राचीन काळातील ऋषीमुनी जेव्हा हिमालयाच्या पायथ्याशी, सप्तसिंधू प्रांतात किंवा आसपासच्या कोरड्या हवामानाच्या प्रदेशात अथवा लोकवस्तीपासून दूर जंगलात राहायचे, तेव्हा त्या भागांत वडाची झाडे नैसर्गिकरीत्या दुर्मिळ असायची. "निसर्गात दुर्मिळ असणाऱ्या गोष्टी अफाट फायदेशीर असतात," हे ऋषीमुनींना ठाऊक होते. त्यामुळे या वृक्षाचे जतन व संवर्धन करण्यासाठी त्यांनी याला धार्मिक कृत्यांशी जोडले. वटपौर्णिमेची कथा आणि वटवृक्ष संवर्धनाची संकल्पना हा याच दूरगामी प्रयत्नांचा एक भाग आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला, म्हणजेच सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश झाल्यानंतर लगेचच येणाऱ्या पौर्णिमेचे औचित्य साधून हा सण सुरू करण्यात आला, जेणेकरून पावसाच्या पाण्यात या झाडांची लागवड सहज व्हावी.

आजच्या काळात वास्तुशास्त्र म्हणजे देवी-देवता, ग्रह-नक्षत्र आणि दिशा-तत्व इत्यादींचा असा संग्रह मानला जातो, ज्यामुळे वास्तूवरील संकटे टळतात. गेल्या ४०० ते ५०० वर्षांपासून यात समाविष्ट केलेली पंचमहाभूते या शास्त्राला अधिक तर्कशुद्ध बनवतात. परंतु, वास्तव यापेक्षा वेगळे आहे. “आजच्या प्रचलित वास्तुशास्त्राचा मानवी कर्मावर १% सुद्धा फरक पडत नाही.”

मुळात मानवाने निसर्गात आणि निसर्गाशी एकरूप होऊन राहण्यासाठी ज्या नियमांची रचना केली, त्याला "वास्तुशास्त्र" म्हटले जाते. हे केवळ एक शास्त्र नसून विज्ञान आणि कलेचा सुंदर संगम आहे. भवन निर्मितीमधील अडथळे दूर करणे आणि मानवी जीवनातील नैसर्गिक आव्हाने—जसे की ऊन, वारा व पाऊस यांच्यापासून रक्षण करणे, हाच याचा मुख्य उद्देश होता. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या "हे विश्वचि माझे घर" या भावनेशी एकरूप असणारा हा संदेश, संपूर्ण पृथ्वीच्या (मानवाचे एकमात्र निवासस्थान) संरक्षणाच्या दृष्टीने मोलाचा आहे.

पृथ्वीवरील जीवनचक्र सुरळीत राहण्यासाठी पिंपळानंतर वडाचा वृक्ष सर्वाधिक प्राणवायू (ऑक्सिजन) निर्माण करतो. वड, पिंपळ आणि तुळस ही झाडे रात्रीच्या वेळीही प्राणवायूची निर्मिती करतात. एक मोठे वडाचे झाड दिवसाला अंदाजे ३५० ते ४०० लीटर किंवा त्याहून अधिक शुद्ध प्राणवायू हवेत सोडते.

या व्यतिरिक्त वडाचे इतरही फायदे आहेत जसे की, वातावरणातील कार्बन शोषून घेऊन हवामान बदलाचा (क्लायमेट चेंज) धोका कमी करणे, जमिनीची सुपीकता वाढवणे आणि पारंब्यांद्वारे पावसाचे पाणी थेट जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढवणे, ही कामे वड प्रभावीपणे करतो. वादळ-वाऱ्यामुळे होणारी मातीची धूप थांबवणे, वायू प्रदूषण नियंत्रित करणे आणि दाट पानांमुळे ध्वनी प्रदूषण कमी करणे यात वडाचा मोठा वाटा असतो. तसेच, हवेत सल्फरचे प्रमाण वाढल्यास पानांमार्फत संकेत देणारे हे एक नैसर्गिक 'बायो इंडिकेटर' आहे. भूकंपप्रवण क्षेत्रात वडाच्या मुळांच्या घट्ट जाळ्यांमुळे जमिनीला काही प्रमाणात स्थिरता मिळते.

ऐतिहासिक पुराव्यांवरून असे दिसून येते की, इसवी सन ९०० पर्यंतचा काळ भारतीय उपखंडातील हवामानासाठी अत्यंत अनुकूल होता, कारण तेव्हा वडाच्या झाडांची संख्या आजच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त होती आणि लोकसंख्या मर्यादित होती. यामुळेच इसवी सन ९०० ते १३०० या "मध्ययुगीन उबदार काळात" उत्कृष्ट हवामान आणि उत्तम भूजल पातळी लाभली.

परंतु, इसवी सन १३०० नंतर, विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर वाढती लोकसंख्या आणि बदलत्या जीवनशैलीमुळे मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली. मानवाला जगाची लोकसंख्या पहिल्या १ अब्जापर्यंत पोहोचवण्यासाठी जवळपास १५,००० वर्षे लागली; परंतु दुसरा १ अब्जाचा टप्पा पार करण्यासाठी अवघी १०० वर्षे लागली. आज हा वेग एवढा वाढला आहे की दर १० ते १५ वर्षांत १ अब्ज लोकसंख्या वाढत आहे. परिणामी, वटवृक्षांसारख्या महाकाय झाडांची संख्या झपाट्याने घटली आणि जागतिक तापमानवाढीचे संकट उभे राहिले.

वरील आलेख (ग्राफ) एक अंदाजित चित्र रेखाटतो, जो इसवी सन पूर्व ४०० मधील आणि आधुनिक कालखंडातील पावसाच्या स्वरूपाची तुलना करतो. यातील निळी रेषा पूर्वीचा नियमित पाऊस दर्शवते, तर हिरवी रेषा आजचा विस्कळीत पाऊस दर्शवते. यावरून असे समजते कि, पूर्वीचा पाऊस आणि आजचा पाऊस यांच्या स्वरूपात मोठा बदल झाला आहे. पूर्वी पावसाचे प्रमाण आणि आजचे प्रमाण सारखेच असले, तरी पूर्वीचा पाऊस संथ व संततधार असायचा, ज्यामुळे पाणी जमिनीत मुरायचे. आजचा पाऊस अचानक आणि अतिवृष्टीसारखा येतो, ज्यामुळे पूर येतात पण भूजल पातळी वाढत नाही. तसेच, 'अल् निनो'चा वाढता प्रभाव आणि प्रदूषणामुळे हवामान अत्यंत अस्थिर झाले आहे, ज्यामुळे हवामान खात्याचे अंदाजही अनेकदा चुकतात.

आज नव्या पिढीने वटपौर्णिमेच्या मूळ संदेशाकडे कानाडोळा करून केवळ विधी-विधानांवर लक्ष केंद्रित केले आहे. परिणामी, हा सण फक्त पूजा-अर्चा आणि पौराणिक कथांपुरताच मर्यादित राहिला आहे. पृथ्वी वाचवण्यासाठी आणि मानवाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी वडाच्या झाडांचे संवर्धन करणे आणि लोकसंख्या नियंत्रित करणे अत्यंत आवश्यक आहे. या वटपौर्णिमेच्या निमित्ताने, प्रत्येकाने आपल्या परिसरातील मोकळ्या जागेत किमान एक वडाचे झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करायला हवा, हीच सावित्रीच्या व्रताची खरी आधुनिक व्याख्या ठरेल.

No comments:

Post a Comment

लोकसंख्या व बदलते वास्तु नियम: पोषक ते शोषक प्रवास

कोणत्याही जिवंत संस्कृतीचे आणि मानवी प्रगतीचे दर्शन तेथील वास्तुकलेमध्ये घडत असते. मानवाने जेव्हा वास्तूची रचना करण्यास सुरुवात केली, तेव्हा...